India vs West Indies 2nd T20I Live Marathi : भारताच्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला २ धावांवर २ धक्के बसले. पण, निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांनी भारतीय गोलंदाजांना बेक्कार चोपले. ही भागीदारी तोडण्यासाठी भारताकडून प्रयत्न होताना दिसले, त्यात यष्टिरक्षक इशान किशन जास्तच स्मार्ट बनायला गेला अन्...
हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मायर्स ( १५) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली. निकोलसची फटकेबाजी काही थांबता थांबत नव्हती. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात त्याने ४,६,०,४,४,० अशा १८ धावा कुटल्या. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल यांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली आणि पूरनने २९ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक झळकावले. हार्दिकने तिसरी विकेट घेतली. पॉवेल २१ धावांवर बाद झाला अन् पूरनसह त्याची ३७ चेंडूंवरील ५७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर पॉवेल आधीच LBW झाला असता, पंरतु हाताशी DRS असूनही हार्दिकने तो घेतला नाही. रिप्लेमध्ये पॉवेल बाद असल्याचे दिसत होते. त्याआधी ६.१ षटकात इशान किशनने पॉवेलला बाद करण्यासाठी चिटींग केली. युझवेंद्र चहचा चेंडू Wide गेला होता. त्यावर पॉवेलचा स्वीप मारण्याचा फटका चूकला. पॉवेल क्रिजवरून पाय उचलण्याची इशानने प्रतिक्षा केली अन् पॉवेलचा पाच उठताच बेल्स उडवून स्टम्पिंगची अपील केली. रिप्लेमध्ये इशानचा टायमिंग थोडक्यात चुकल्याचे दिसले अन् पॉवेल नाबाद राहिला.