India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी उल्लेखनीय खेळी करताना वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. पूरनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. पण, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा पारा चढलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणामुळे रोहित आधीच वैतागला होता, परंतु त्यात एक प्रसंग घडला की त्याला स्वतःवर ताबा राखता आला नाही.
रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित व विराट यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने २४ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट घेत भारताला धक्के दिले.
प्रत्युत्तरात विंडीजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फिरकी गोलंदाजीवर चाचपडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खिंडीत पकडण्यासाठी रोहितने लगेच युझवेंद्र चहलला आणले. चहलने ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कायल मेयर्सला ( ९) बाद केले. मालिकेत दुसऱ्यांदा चहलने त्याची विकेट घेतली. त्यानंतर रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच ( सामन्यातील ९) षटकात ब्रेंड किंगला ( २२) बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. निकोलस पूनरला चहलने बाद केले होते, परंतु बिश्नोईने त्याचा झेल सोडला. पूरन व रोवमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना विंडीजचा डाव सावरला.
विंडीजला ३६ चेंडूंत ७२ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स होत्या. १६व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याच्याच गोलंदाजीवर पॉवेलचा झेल सोडला अन् त्यानंतर रोहितचा पारा चढला. रोहितनं चेंडूला लाथ मारल्यानंतर भुवनेश्वरकडे बघून तो रागाने काहीतरी म्हणाला.