India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं. दोघांच्या वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने सामन्यात बाजी मारण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, भुवनेश्वर कुमारने त्याच्या अनुभवाच्या जोरावर हा सामना खेचून आणला. पॉवेलला दिलेल्या जीवदानाची भरपाई भुवीनं पूरनची विकेट काढून केली अन् सामन्याला कलाटणी दिली. हर्षल पटेलने अखेरच्या षटकात टिच्चून मारा करताना भारताचा विजय पक्का केला. भारतानं ट्वेंटी-20 मालिकाही जिंकली.
रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित व विराट यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने २४ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट घेत भारताला धक्के दिले.
प्रत्युत्तरात विंडीजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फिरकी गोलंदाजीवर चाचपडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खिंडीत पकडण्यासाठी रोहितने लगेच युझवेंद्र चहलला आणले. चहलने ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कायल मेयर्सला ( ९) बाद केले. मालिकेत दुसऱ्यांदा चहलने त्याची विकेट घेतली. त्यानंतर रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच ( सामन्यातील ९) षटकात ब्रेंड किंगला ( २२) बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. निकोलस पूनरला चहलने बाद केले होते, परंतु बिश्नोईने त्याचा झेल सोडला. पूरन व रोवमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना विंडीजचा डाव सावरला.
विंडीजला ३६ चेंडूंत ७२ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स होत्या. १६व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याच्याच गोलंदाजीवर पॉवेलचा झेल सोडला अन् त्यानंतर रोहितचा पारा चढला. रोहितनं चेंडूला लाथ मारल्यानंतर भुवनेश्वरकडे बघून तो रागाने काहीतरी म्हणाला. भुवीच्या त्या षटकात १० धावा आल्या. त्यानंतर दीपक चहरने टाकलेल्या १७व्या षटकात १६ धावा कुटल्या गेल्या. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी वैयक्तित अर्धशतकही पूर्ण केले. हर्षल पटेलने १८व्या षटकात ८ धावा देत सामन्यात अजूनही भारताचे आव्हान जीवंत ठेवले होते. पूरन व पॉवेल यांनी ६२ चेंडूंत शतकी भागीदारी केली. १९व्या षटकात भुवीने ही भागीदारी तोडली. पूरन ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला.
पूरन बाद झाला तेव्हा विंडीजला ९ चेंडूंत २८ धावा हव्या होत्या. भुवीने १९ व्या षटकात ४ धावा देताना १ विकेट घेतली अन् सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. विंडीजला ६ धावांत २५ धावा करायच्या होत्या. अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा आल्यानंतर पॉवेलने पुढील दोन चेंडू सीमापार पाठवले. पण, ५ व्या चेंडूवर हर्षलने एकच धाव दिली अन् इथे भारताने बाजी मारली. पॉवेल ३६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजला ३ बाद १७८ धावाच करता आल्या. भारताने ८ धावांनी हा सामना जिंकला.