India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला. शेल्डन कोट्रेलच्या चेंडूचा अंदाज घेण्यात तो चूकला अन् कायल मेयर्सने ( २) त्याचा सोपा झेल घेतला. शेल्डन कोट्रेलच्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित मारलेला फटका चुकला अन् चेंडू जागच्या जागी हवेत उडाला. तो टप्पा खावून स्टम्प्सवर आदळतोय असे रोहितला वाटले, परंतु चेंडू नेमका कुठेच हेच त्याला माहित नव्हते. म्हणून त्यानं संपूर्ण स्टम्प्सना वेढा घातला. इशान किशन २ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.
ही जोडी आज कमाल करणार असे वाटत असताना पोलार्डने ७व्या षटकात रोस्टन चेसला गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात रोहितला धक्का दिला.. रोहित १८ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह १९ धावांवर झेलबाद झाला आणि विराटसह त्याची ४९ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने सुरूवात खणखणीत चौकाराने केली, परंतु रोस्टन चेसने पुढील षटकात त्यालाही चालते केले. त्यामुळे पहिल्या १० षटकांत भारताच्या ३ बाद ७६ धावा झाल्या होत्या. विराट आज भलत्याच फॉर्मात दिसला. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, पुल, लेट कट, रिव्हर्स स्विप असे भात्यातील सर्व फटके त्याने आज आजमावले.
विराटने खणखणीत षटकार मारून ट्वेंटी-२०तील ३० वे अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या नेतृत्वाखाली हे त्याचे पहिलेच , तर वेस्ट इंडिजविरुद्धचे सहावे अर्धशतक ठरले. ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०+ धावा करण्याच्या रोहितच्या ( ३०) विक्रमाशी विराटने बरोबरी केली. विराटने ९७ सामन्यांत हा पराक्रम केला, तर रोहितला १२१ सामने खेळावे लागेल. मात्र, रोस्टन चेसने विराटला बाद केले. ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावावंर विराट त्रिफळाचीत झाला. रोस्टनने त्याच्या चार षटकांत रोहित, सूर्यकुमार व विराट अशा तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.