India vs West Indies 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक व आर अश्विन असे मात्तबर खेळाडू तंबूत पाठवून ओबेड मॅकॉयने ( Obed McCoy) भारताचे कंबरडे मोडले. वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाला कमी धावांत रोखले. मॅकॉयने ६वी विकेट घेत इतिहास घडवताना ट्वेंटी-२०त वेस्ट इंडिजकडून सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला. भारतीय संघात फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला आज खेळवण्यात आले आहे. हर्षल पटेलला दुखापत झाल्याने तो आजच्या व तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले. ३ तास विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना निराश केले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहिल्याच चेंडूवर ओबेड मॅकॉयने अप्रतिम बाऊन्सर फेकून भारताला पहिला धक्का दिला. अकिल होसैनने हवेत झेपावत अप्रतिम झेल घेतला. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमारने सुरेख षटकार खेचला, परंतु मॅकॉयने त्यालाही चकवले आणि यष्टिरक्षकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताला १७ धावांवर दोन धक्के बसले. श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांच्यावर मोठी जबाबदारी होती आणि दोघांनी काही सुरेख फटकेही मारले. पण, अल्झारी जोसेफचा बाहेर जाणाऱ्या बाऊन्सरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १०) याने विकेट टाकली. त्यानंतर रिषभला अती घाई पुन्हा नडली आणि तो २४ धावांवर झेलबाद झाला. भारताला ६१ धावांवर चार धक्के बसले. उप कर्णधार हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीने भारताचा डाव ४३ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने ही जोडी तोडताना हार्दिकला ३१ धावांवर बाद केले.
विकेट सांभाळून खेळण्याची गरज असताना जडेजा विचित्र फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. २५ धावांवर त्याला जीवदान मिळाले. पण, दोन धावांची भर घालून जडेजाने मॅकॉयला विकेट दिली. मॅकॉयने भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला. भारताचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १३८ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डरने दोन विकेट्स घेतल्या.