India vs West Indies 2nd T20I Live Updates : भारतीय फलंदाजांनी आज निराश केले. ओबेड मॅकॉयच्या भेदक माऱ्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. पण, भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही विंडीजला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात १० धावांची गरज असताना रोहित शर्माने चेंडू भुवनेश्वर कुमारकडे न देता आवेश खानला गोलंदाजीला बोलावले. त्याचा हा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता अन् दोन चेंडूंत विंडीजने निकाल लावला. वेस्ट इंडिजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहिल्याच चेंडूवर मॅकॉयने अप्रतिम बाऊन्सर बाद झाला. सूर्यकुमार यादन ( १७), श्रेयस अय्यर ( १०), रिषभ पंत ( २४) हे फलकावर ६१ धावा असताना माघारी परतले. उप कर्णधार हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीने भारताचा डाव ४३ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने ही जोडी तोडताना हार्दिकला ३१ धावांवर बाद केले. विकेट सांभाळून खेळण्याची गरज असताना जडेजा विचित्र फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. २५ धावांवर त्याला जीवदान मिळाले. पण, दोन धावांची भर घालून जडेजाने मॅकॉयला विकेट दिली. भारताचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १३८ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डरने दोन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक व आर अश्विन असे मात्तबर खेळाडू मॅकॉयने ( Obed McCoy) तंबूत पाठवले. मॅकॉयने ६वी विकेट घेत इतिहास घडवताना ट्वेंटी-२०त वेस्ट इंडिजकडून सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने आक्रमक सुरुवात केली. ब्रेंडन किंग व कायले मेयर्स यांची ४६ धावांची भागीदारी हार्दिक पांड्याने संपुष्टात आणली. मेयर्स ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर अश्विनने कर्णधार निकोलस पूरनला १४ धावांवर माघारी पाठवले. पण, किंग्स फटकेबाजी करत होता. विंडीजने १० षटकांत २ बाद ७३ धावा केल्या.
शिमरोन हेटमायर ४ धावांवर झेलबाद झाला असता, परंतु रिषभ पंतने तो टिपण्यापूर्वी टप्पा पडला. झेल घेतल्यावर जोरदार अपील झाले अन् हेटमायर तंबूच्या दिशेने जाताना दिसला, परंतु रिषभलाही झेल टिपल्याचा विश्वास नव्हता अन् हेटमायर थांबला. मैदानावरील अम्पायरने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली अन् हेटमायरला जीवदान मिळाले. किंग्सने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हेटमायरला ( ६) मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही अन् रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो रिटर्न कॅच देऊन बाद झाला. आवेश खानने मोक्याच्या क्षणी भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. किंग ५२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांत माघारी परतला.
आता भारतीय गोलंदाजांनी फास आवळायला सुरुवात केली. अन् चेंडू व धावा यांच्यातील अंतर हळुहळू वाढवत गेले. विंडीजला १२ चेंडूंत १६ धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगने १९व्या षटकात रोवमन पॉवेलचा ( ५) यॉर्करवर त्रिफळा उडवून विंडीजला पाचवा धक्का दिला. अर्शदीपने त्या षटकात ६ धावा देताना १ विकेट घेतली. विंडीजला ६ धावांत १० धावांची गरज होती. २०व्या षटकात आवेश खानचा पहिलाच चेंडू नो बॉल पडला अन् फ्री हिटवर डेव्हॉन थॉमसने षटकार खेचला. ५ चेंडू २ धावा असा सामना विंडीजच्या बाजूने झुकला. थॉमसने चौकार खेचून विंडीजला विजय मिळवून दिला. विंडीजने ५ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
Web Title: IND vs WI 2nd T20I Live Updates : Devon Thomas is the hero, West Indies beat India by 5 wickets and level the series by 1-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.