IND vs WI 2nd Test : बंगालचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार ( Mukesh Kumar) याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी दिली गेली आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी मुकेश टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. पहिल्या कसोटीत भारताने १ डाव व १४१ धावांनी विजय मिळवला होता आणि हाच संघ कायम राखण्याचा रोहित शर्माचा मानस होता. पण, शार्दूल ठाकूरला दुखापत झाली अन् कर्णधाराला इच्छा नसताना प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागला. ''शार्दूल ठाकूरच्या डाव्या मांडीला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही,''असे बीसीसीआयने ट्विट केले.
आजच्या सामन्यात मुकेश कुमारला ( Mukesh Kumar) पदार्पणाची संधी दिली गेली. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते. २००८-०९ मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. २५-२५ षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत ३४ बळी घेतले. एका वर्षानंतर त्याने बीसीसीआयने आयोजित केलेल्या असोसिएट स्पर्धेत बिहार अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले. ( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)
रोहित शर्मा म्हणाला,''दुर्दैवाने शार्दूलला सामन्यातून माघार घ्यावी लागली. तो तंदुरुस्त नाही. मुकेश कुमार आज पदार्पण करतोय. मुकेश खूप प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे.'' मुकेशने ३९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४९, २४ लिस्ट ए क्रिकेटमध्ये २६ आणि ३३ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. शार्दूल ठाकूरच्या जागी मुकेशला संधी दिली गेली आहे.