IND vs WI 2nd Test : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तीन दिवसात हार पत्करावी लागलेल्या वेस्ट इंडिज संघाने कोलांटी उडीचा आधार घेतल्याचे दिसतेय... २० जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी विंडीजने आज १३ सदस्यीय संघाची घोषणा केली. ऑफ स्पिनर अष्टपैलू खेळाडू केव्हीन सिनक्लेअर ( Kevin Sinclair) याला कसोटी पदार्पणाची संधी क्रिकेट वेस्ट इंडिजने ( CWI) दिली आहे. विकेट घेतल्यानंतर हवेत कोलांटी उडी मारण्यासाठी ओळखला जाणाऱ्या केव्हिनच्या येण्याने विंडीजची गोलंदाजीची धार तीव्र झालीच आहे, शिवाय त्यांना फलंदाजीसाठी एक अतिरिक्त पर्याय मिळाला आहे. त्याच्यासाठी रेयमन रेइफरला बसवण्यात आले आहे.
विंडीजच्या १३ सदस्यीय संघात हा एकमेव बदल आहे, परंतु त्रिनिदाद कसोटीत दुखापत झाल्यास बॅक अपम्हणून रेइफर संघासोबत असणार आहे. गयानाचा २३ वर्षीय केव्हिनचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रम चांगला आहे. त्याने १८ प्रथम ८ श्रेणी सामन्यांत २३.९८च्या सरासरीने ५४ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६ बाद ३३ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीत त्याने सहा अर्धशतकांसह २९.०७च्या सरासरीने ७५६ धावा केल्या आहेत.
बांगलादेश अ संघाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत तो खेळला होता आणि त्याने १३ विकेट्स व १४९ धावा करून वेस्ट इंडिज अ च्या १-० अशा विजयात हातभार लावला होता. केव्हिनने सात वन डे व सह ट्वेंटी-२० सामन्यांत विंडीज संघाचे प्रतिनिधीत्व करताना ११ व ४ विकेट्स घेतल्या आहेत. झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत तो संघाचा सदस्य होता आणि त्याने ३ सामन्यांत २ विकेट्स घेतल्या होत्या. २० ते २४ जुलै या कालावधीत पोर्ट ऑफ स्पेन येथे ही कसोटी होणार आहे आणि भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली ही १०० वी कसोटी आहे. उभय संघ १९४८ मध्ये ( दिल्ली) पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळले होते.
वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाझे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कोर्नवॉल, जोशूआ डा सिल्वा, शेनॉन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, केव्हिन सिनक्लेअर, जोमेल वॉरिकन.