India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा जवळपास ३-साडेतीन तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजने २ बाद ७६ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी २८९ धावा करायच्या होत्या. दुसरीकडे भारताला ही मालिका २-० अशी जिंकण्यासाठी ९८ षटकांत ८ विकेट्स घ्यायच्या होत्या. पण, पावसाने टीम इंडियाचा खेळ बिघडवला आहे आणि वेस्ट इंडिजचा मार्ग मोकळा केलाय.
भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा ( ५७) व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली. इशानने चौथ्या क्रमांकावर येताना ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला.
आर अश्विनने चौथ्या दिवशी क्रेग ब्रेथवेट ( २८) व किर्क मॅकेंझी ( ०) यांना माघारी पाठवले. तेजनारायण चंद्रपॉल ( २४) व जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) खेळपट्टीवर होते. पावसाने भारताच्या मार्गात अडथळा निर्माण केला अन् साडेतीन तासांचा खेळ वाया गेला. अडीच तासांच्या फटकेबाजीनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि भारतीय वेळेनुसार १०.४५ वाजता पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात होण्याची घोषणा झाली. पण, आता केवळ ६७ षटकं ( तेही परिस्थितीवर अवलंबून) फेकली जाणार आहेत आणि भारताला याच षटकांत ८ विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. तेच विंडीजला सामना ड्रॉ करण्यासाठी आता किमान ३१ षटकं कमी खेळावी लागणार आहेत.