India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा जवळपास ५ तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजने २ बाद ७६ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी २८९ धावा करायच्या होत्या. अडीच तास पाऊस पडल्यानंतर १०.४५ वाजता मॅच सुरू होईल असे सांगण्यात आले, परंतु १०.३९ वाजता पाऊस पुन्हा सुरू झाला. मग ११.१० वाजता सुरू होणारी मॅच ११.०९ वाजता पुन्हा पाऊस आल्याने सुरू झालीच नाही आणि अजूनही क्विन्स पार्कवर पाऊस सुरूच आहे.
भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने चौथ्या दिवशी क्रेग ब्रेथवेट ( २८) व किर्क मॅकेंझी ( ०) यांना माघारी पाठवले. तेजनारायण चंद्रपॉल ( २४) व जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) खेळपट्टीवर होते. सतत पाऊस पडूनही ग्राऊंडस्टाफ चांगले काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या मेहनतीमुळे कालही प्रचंड पाऊस पडूनही खेळपट्टी टवटवीत राहिली आणि मैदानही लवकर सुकवण्यात आले.
पक्ष्यांचा इशारा अन्...क्वीन्स पार्क ओव्हल येथील ग्राउंड स्टाफ पक्ष्यांच्या उडण्याची पद्धत पाहून पावसाचा अंदाज बांधतात अन् तयारी करतात. हे पक्षी पावसाच्या आधी गोलाकार पॅटर्नमध्ये उडतात आणि पावसाचे आगमन होताच अगदी खाली येतात. हे पाहून ग्राऊंड्समन झटपट कामाला लागतात आणि खेळपट्टी लगेच झाकतात.