India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चांगला खेळ केला होता. फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर तेही चांगले खेळले, परंतु एकदा गळती लागली अन् ते बॅकफूटवर फेकले गेले. चौथ्या दिवसाच्या पहिल्या ४ षटकांत ३ धक्के बसल्याने भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली.
भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७५), तेजनारायण चंद्रपॉल ( ३३), किर्म मॅकेंझी ( ३२), जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) आणि जोशुआ डा सिल्व्हा ( १०) बाद झाल्याने तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२९ धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात मुकेश कुमारने भारताला यश मिळवून दिले. एलिक अथानाझे ( ३७) पायचीत झाला अन् भारत पुन्हा फ्रंटसीटवर बसला. दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने आणखी एक विकेट घेताना जेसन होल्डरला ( १५) झेलबाद केले. अल्झारी जोसेफही ( ४) सिराजच्या गोलंदाजीवर LBW झाला.
सिराज थांबायला तयार नव्हता अन् त्याने या सत्रातील तिसरी विकेट घेताना विंडीजचा ९वा फलंदाज माघारी पाठवला. इशान किशनने यष्टिंमागे केमार रोचचा ( ४) सुरेख झेल टिपला. विंडीजने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या. सिराजने आणखी एक धक्का देताना विंडीजचा पहिला डाव २५५ धावांवर गुंडाळला अन् भारताने १८३ धावांची आघाडी घेतली.