India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने त्याची ५००वी आंतरराष्ट्रीय मॅच शतक झळकावून गाजवली. रवींद्र जडेजासह त्याने दीडशतकी भागीदारी करताना वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढवली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांच्या दमदार सुरूवातीनंतर विराट-रवींद्रने भारताची धावसंख्या वाढवली. शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, इशान किशन यांनी निराश केले. आर अश्विनने अर्धशतक झळकावताना भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला.
यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा ( ८०) यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ६१ धावांत ४ विकेट घेत पुनरागमन केले होते. विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या २८६ चेंडूंत १५९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला ९९व्या षटकात नजर लागली. २०६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावा करणारा विराट कोहली रन आऊट झाला. विराट कसोटी कारकीर्दित केवळ तीन वेळा रन आऊट झाला आहे. जडेजाही १५२ चेंडूंत ६१ धावांवर झेलबाद झाला अन् भारताला ३६० धावांवर सहावा धक्का बसला.
२१ धावांवर इशान किशनला जीवदान मिळाले अन् चौकार गेला. पण, जेसन होल्डरने पुढच्याच चेंडूवर इशानला ( २५) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. आर अश्विन चांगली फलंदाजी करताना दिसला अन् भारताने चारशे धावांचा टप्पा ओलांडला. अश्विनसह आठव्या विकेटसाठी जयदेव उनाडकटने चांगली खिंड लढवली होती, परंतु जोमेल वॉरिकनने ही भागीदारी तोडली. जयदेव ( ७) यष्टिचीत झाला. त्यानंतर वॉरिकनने ९वी विकेट घेताना मोहम्मद सिराजला पायचीत केले. अश्विनने ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अश्विन ५६ धावांवर बाद झाला अन् भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या.