India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला अन् भारताने पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) २३.४-६-६०-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली आणि ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा या जोडीने दुसऱ्या डावात स्फोटक खेळी केली. भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले, परंतु १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात जे कुणालाच जमले नव्हते, असा पराक्रम हे दोघं करून गेले.
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! यशस्वी जैस्वालसह केला ९१ वर्षांच्या कसोटी इतिहासात न घडलेला पराक्रम
भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७५), तेजनारायण चंद्रपॉल ( ३३), किर्म मॅकेंझी ( ३२), जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) आणि जोशुआ डा सिल्व्हा ( १०) बाद झाल्याने तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२९ धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विंडीजचा डाव गडगडला. एलिक अथानाझे ( ३७), जेसन होल्डर( १५), अल्झारी जोसेफ ( ४), केमार रोच ( ४) व शेनॉन गॅब्रिएल ( ०) हे झटपट बाद झाले. कालच्या ५ बाद २२९ धावांवरून आज सुरूवात करणाऱ्या विंडीजने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या.
रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ४ षटकांत ४१ धावा फलकावर चढवल्या. ५.३ षटकांत रोहित-यशस्वीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि ही भारताची सर्वात जलद भागीदारी ठरली. गॅब्रिएलने रोहितची ( ५७) विकेट मिळवली. भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. लंच ब्रेकनंतर यशस्वी ३८ धावांवर जोमेल वॉरिकनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. भारताला १०२ धावांवर दुसरा धक्का बसला, परंतु १२.२ षटकांत शतकी टप्पा ओलांडून भारताने इतिहास रचला. कसोटी क्रिकेट इतिहासातील ही एखाद्या संघाने सर्वात जलद १०० धावा करण्याची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी २००१मध्ये श्रीलंकेच्या मार्वन अटापट्टू व कर्णधार सनथ जयसूर्या यांनी बांगलादेशविरुद्ध ८० चेंडूंत १०० धावा चढवल्या होत्या. हा रेकॉर्ड आज भारताने मोडला.