Join us  

आर अश्विनच्या २ विकेट्सने भारतासाठी उघडले विजयाचे दार! पाचव्या दिवशी विंडीजलाही समान संधी

India vs West Indies 2nd Test Live Marathi :  भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३६५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला धक्के बसले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 3:34 AM

Open in App

India vs West Indies 2nd Test Live Marathi :  भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३६५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला धक्के बसले आहेत. पाचव्या दिवशी भारताला विजय मिळवण्याची आणि मालिका २-० अशी खिशात घालण्याची संधी आहे. आर अश्विनने ( R Ashwin ) दोन विकेट्स घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले आहे. पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ८ विकेट्स घ्याव्या लागणार आहेत, तर यजमानांची खरी कसोटी असणार आहे. 

इशान किशन Rishabh Pant च्या बॅटने खेळला, Dhoni चा विक्रम मोडला; कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवशी २६ धावांत विंडीजचे ५ फलंदाज माघारी परतले. भारताने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केला. रोहित शर्मा ( ५७)  व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली. इशानने चौथ्या क्रमांकावर येताना  ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला. 

 क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात केली. ब्रेथवेटने खेळपट्टीवर जम बसताच काही सुरेख फटके मारले. चंद्रपॉल संयमी खेळ करून एका बाजूला उभा होता. रोहितने क्षेत्ररक्षणात बदल करताना विंडीजच्या धावा गोठवल्या. मुकेश कुमारने सलग तीन षटकं निर्धाव टाकली, तर चंद्रपॉलला २१ चेंडूंनंतर पहिली धाव घेता आली. भारतीय गोलंदाज यजमानांवर दडपण निर्माण करताना दिसले. त्यात आर अश्विनने प्लान आखून ब्रेथवेटला ( २८) स्वीप मारण्यास भाग पाडले अन् जयदेवने सोपा झेल टिपला. विंडीजला ३८ धावांवर हा धक्का बसला. टॉम लॅथम नंतर अश्विनने ब्रेथवेटला सर्वाधिक ८ वेळा बाद केले. अश्विनने पुढच्याच षटकात किर्क मॅकेंझीला ( ०) पायचीत केले. 

या विकेटसह अश्विनने रवींद्र जडेजासह कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा गाठला. अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी मिळून ५०१ विकेट्स घेतल्या आहेत.चौथ्या दिवसअखेर विंडीजने २ बाद ७६ धावा केल्या. चंद्रपॉल २४ व ब्लॅकवूड २० धावांवर खेळत आहेत. वेस्ट इंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी ९८ षटकांत २८९ धावा हव्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजआर अश्विन
Open in App