India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय. फलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना अधिकची मेहनत करावी लागत आहे. विंडीजने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केल्यानंतर क्रेग ब्रेथवेट व पदार्पणवीर किर्म मॅकेंझीने डाव सावरला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही जोडी सकारात्मक खेळ करताना दिसली, परंतु भारताकडून पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने ( Mukesh Kumar) धक्का दिला.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीचे ( १२१) शतक, रोहित शर्मा ( ८०) , रवींद्र जडेजा ( ६१) , यसश्वी जैस्वाल ( ५७) आणि आर अश्विन ( ५६ ) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकन व केमार रोच यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी आश्वासक सुरूवात केली. या दोघांनी ३४.२ षटकं खेळून काढताना ७१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. चंद्रपॉल ( ३३) माघारी परतल्यानंतर ब्रेथवेट ( ३७*) व किर्म मॅकेंझी ( १४*) यांनी दिवसअखेर १ बाद ८६ धावांपर्यंत संघाला पोहोचवले होते.
ब्रेथवेट आणि मॅकेंझी यांनी तिसऱ्या दिवसात संयमी सुरुवात करताना भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहिली. पदार्पणवीर मुकेश कुमारने ही ४६ धावांची भागीदारी तोडताना मॅकेंझीला ( ३२) माघारी पाठवले. विंडीजला ११७ धावांवर दुसरा धक्का बसला आणि पावसाच्या आगमनामुळे खेळ थांबला.