India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटी पावसामुळे रद्द करावी लागली. पाचव्या दिवसाचा जवळपास ५ तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आणि अखेरीस १२.१५ वाजता BCCI ने ही कसोटी रद्द झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला मालिकेत १-० अशा विजयावर समाधान मानावे लागले. या निर्णयामुळे पाकिस्तानचा मात्र फायदा झाला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ पर्वात ते अव्वल स्थानावर पोहोचले आहेत.
भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने चौथ्या दिवशी क्रेग ब्रेथवेट ( २८) व किर्क मॅकेंझी ( ०) यांना माघारी पाठवले. तेजनारायण चंद्रपॉल ( २४) व जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) खेळपट्टीवर होते. पाचव्या दिवशी भारताला ९८ षटकांत ८ विकेट्स घ्यायच्या होत्या, तर विंडीजला २८९ धावा करायच्या होत्या.
पण, अडीच तास पाऊस पडल्यानंतर १०.४५ वाजता मॅच सुरू होईल असे सांगण्यात आले, परंतु १०.३९ वाजता पाऊस पुन्हा सुरू झाला. मग ११.१० वाजता सुरू होणारी मॅच ११.०९ वाजता पुन्हा पाऊस आल्याने सुरू झालीच नाही आणि अखेरीस पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. यामुळे WTC Standing मध्ये पाकिस्तान १०० टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहाचला, तर भारताला ६६.६७ टक्क्यांमुळे दुसऱ्या स्थानी घसरण झाली. ऑस्ट्रेलिया ( ५४.१७) व इंग्लंड ( २९.१७) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. विंडीजने १६.६७ टक्क्यांसह पाचव्या स्थानी झेप घेतली.