India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०+ धावा करून इतिहास घडविला. आतापर्यंत ५००व्या आंतरराष्ट्रीय एकाही फलंदाजाला ५०+ धावा करता आल्या नव्हत्या. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ६१ धावांत ४ विकेट घेत पुनरागमन केले होते. पण, विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताला पुन्हा फ्रंटसीटवर आणले.
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
यशस्वी व रोहितने पहिले सत्र गाजवल्यानंतर लंच ब्रेकनंतर विंडीजने मॅच फिरवली. जेसन होल्डरने भारताला पहिला धक्का दिला. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला. केमार रोचने शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. जोमेल वॉरिकनच्या अप्रतिम चेंडूवर रोहितही १४३ धावांच ९ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर त्रिफळाचीत झाला. बिनबाद १३९ वरून भारताची अवस्था ३ बाद १५५ अशी केली. अजिंक्य रहाणे व विराट कोहली यांनी संयमी खेळ केला. उप कर्णधार अजिंक्य ( ८) पुन्हा अपयशी ठरला.
( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)
५००वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या विराटने सुरुवातीला संयमी खेळ केला, परंतु हळूहळू त्याने धावांचा वेग वाढवला. त्याने मारलेले कव्हर ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. विराटने सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. ५००व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०+ धावा करणारा विराट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने परदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या विक्रमात रिकी पाँटिंगला मागे टाकले. विराट व जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०१ चेंडूंत नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दिवसअखेर ८४ षटकांत ४ बाद २८८ धावा केल्या. विराट १६१ चेंडूंत ८ चौकारांसह ८७ धावांवर नाबाद आहे, तर जडेजानेही नाबाद ३६ धावा केल्या आहेत.