India Vs West Indies 2nd Test Live : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पुन्हा एकदा भारताला दमदार सुरूवात करून दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत या जोडीने पहिल्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या. लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने सामन्यावर पकड घेतली होती, परंतु ब्रेकनंतर विंडीजने चांगले पुनरागमन केले. भारताने अवघ्या १६ धावांत ३ फलंदाज गमावले. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहित शर्माचा असा त्रिफळा उडाला की चेंडू त्यालाच नाही कळला. जोमेल वॉरिकनने ही ड्रिम विकेट मिळवली
यशस्वी जैस्वालचे ४ मोठे रेकॉर्ड! गावस्कर, गांगुली, द्रविड यांच्याशी बरोबरी; रोहितसह रचला इतिहास
वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारा निर्णय घेतला. गोलंदाजांना अजिबात मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर विंडीजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या कसोटीत २२९ धावांची विक्रमी भागीदारी करणाऱ्या रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल जो़डीने दुसऱ्या कसोटीतही शतकी भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना विंडीजला हैराण केले. ( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)
रोहित-यशस्वी जोडीला रोखणं विंडीजला सोपं नक्कीच नव्हतं. या दोघांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. रोहितने अर्धशतक पूर्ण केले अन् यशस्वीसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. ५२ धावांवर यशस्वीला आणखी एक जीवदान मिळाले. लंच ब्रेकनंतर विंडीजला यश मिळाले. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर यशस्वीचा झेल सुटला होता, परंतु यावेळेस मॅकेंझीने सुरेख झेल टिपला. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला आणि रोहितसह त्याची १३९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. त्यानंतर रोहितही १४३ धावांच ९ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर त्रिफळाचीत झाला. बिनबाद १३९ वरून भारताची अवस्था ३ बाद १५५ अशी झाली.