dwayne bravo with team india : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा आणि निर्णायक सामना होत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने विजयी सलामी दिली, तर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाला पराभूत करून यजमानांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील शिलेदारांची वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होसोबत भेट झाली. ब्राव्हो अन् टीम इंडियाच्या ग्रेट भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
ब्राव्होसोबत त्याचा मुलगा देखील व्हिडीओत पाहायला मिळत आहे. खरं तर शनिवारी झालेला सामना जिंकून यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाने सांघिक खेळी करत भारताला ४०.५ षटकांत १८१ धावांवर सर्वबाद केले. १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजने ३६.४ षटकांत ४ बाद १८२ धावा करून विजय साकारला.
दरम्यान, मालिकेतील अखेरचा वन डे सामना त्रिनिदाद येथे ब्रायन लारा क्रिकेट अकादमी या मैदानावर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे आव्हान दोन्हीही संघांसमोर असणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताला दुसऱ्या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. म्हणून आजच्या निर्णायक सामन्यात वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन होईल असे अपेक्षित आहे.
वन डे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड.