India vs West Indies, 3rd ODI Live Updates : रोहित, विराट व शिखर हे आघाडीचे तीनही फलंदाज फलकावर ४२ धावा असताना माघारी परतल्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी भारताचा डाव सावरला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा सामना करताना या जोडीनं ११० धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर दीपक चहरने ( Deepak Chahar) तळाचा चांगली फटकेबाजी करून भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला. वॉशिंग्टन सुंदरही चांगला खेळला.
शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. अल्झारी जोसेफने तिसऱ्या चेंडूवर रोहितचा ( १३) त्रिफळा उडवला आणि पाचव्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. डाव्या बाजूने जाणारा चेंडू विराटने छेडण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची किनार घेत तो यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट ३२ व्या वेळेस भोपळ्यावर बाद झाला, सचिन तेंडुलकर ( ३४) या विक्रमात आघाडीवर आहे.
कोरोनावर मात करून संघात परतलेल्या
श्रेयस अय्यरने यष्टिरक्षक-फलंदाज
रिषभ पंतसह भारताचा डाव सावरला. आघाडीचे तीन फलंदाज ४२ धावांवर माघारी परतल्यांतर अय्यर व पंत यांच्यावर मोठी जबाबदारी होती आणि त्यावर ते खरे उतरले. अय्यरने ७४ चेंडूत त्याचे वन डेतील ९वे अर्धशतक पूर्ण केले. रिषभनेही ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना श्रेयससह शतकी भागीदारीही पूर्ण केली. पण, पंत ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५६ धावांवर माघारी परतला. भारताची चौथी विकेट १५२ धावांवर पडली. चांगल्या फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आज अपयशी ठरला, त्याला ६ धावांवर फॅबियन अॅलेनने बाद केले.
श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्मात दिसत होता, वॉशिंग्टन सुंदरनेही सावध खेळ करताना त्याला साथ दिली होती. पण, ३८व्या षटकात हेडन वॉल्शनं त्याला बाद केले. श्रेयस १११ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ८० धावांवर बाद झाला. शार्दूलच्या जागी आज संधी मिळालेल्या दीपक चहरने कहर केला. त्याने वॉशिंग्टनसह ७व्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. हेडन वॉल्शच्या एका षटकात त्याने ४,४,६ असे सलग खणखणीत फटके मारले. जेसन होल्डरने स्लो बाऊन्सरवर चहरची विकेट घेतली. तो ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून माघारी परतला. वॉशिंग्टनने ३३ धावा केल्या आणि भारताला १० बाद २६५ धावांचा पल्ला गाठून दिला.
Web Title: IND vs WI, 3rd ODI Live Updates : India bowled out for 265 runs with Shreyas Iyer 80, Pant 56, Deepak Chahar 38, Sundar 33
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.