Join us  

IND vs WI 3rd ODI Live Updates : पावसाने वाट अडवली, षटकांची संख्या घटली; सामना पुन्हा सुरू होण्याची वेळ ठरली

India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:13 PM

Open in App

India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी शतकी भागीदारी करून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या भारताच्या महान सलामीवीरांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान पटकावले. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना जवळपास तास-दीड तास थांबवण्यात आला आणि आता नवीन अपडेट्स समोर आले आहेत. 

शिखर धवन व शुबमन गिल यांनी सावध सुरुवात केली. जेसन होल्डरच्या पुनरागमनाने विंडीजच्या गोलंदाजीत प्रभावी बदल जाणवला. दरम्यान, धवनने वन डे क्रिकेटमध्ये ८०० चौकारांचा टप्पा ओलांडला. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली ११५९ चौकारांसह आघाडीवर आहे, त्यानंतर ख्रिस गेल ( ११२८), तमिम इक्बाल ( ८६८) व रोहित शर्मा ( ८५६) यांचा क्रमांक येतो. शिखरने ३७वे अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले.  भारताने २० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. भारताकडून परदेशातील वन डे मालिकेत दोन शतकी भागीदारी करणारी धवन व गिल ही तिसरी भारतीय सलामीवीरांची जोडी ठरली.  सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी २००७मध्ये इंग्लंडविरुद्ध तीन वेळा शतकी सलामी दिली होती, त्यानंतर २०१७मध्ये धवन व अजिंक्य रहाणे यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन द्विशतकी भागीदारी केल्या होत्या. धवन व गिल यांनी या मालिकेत दुसऱ्यांदा शतकी भागीदारी केलीय.  आशिया खंडाबाहेर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणाऱ्या विक्रमात धवनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ( २९) विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात विराट कोहली ( ४९), सचिन तेंडुलकर ( ४८), राहुल द्रविड (४२), सौरव गांगुली ( ३८) व रोहित शर्मा ( ३६) हे आघाडीवर आहेत. 

भारतीय वेळेनुसार ११.१५ मिनिटांनी हा सामना सुरू होणार असून, ४०-४० षटकांची मॅच करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनशुभमन गिलश्रेयस अय्यर
Open in App