India vs West Indies, 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय मिळवताना मालिका ३-० अशी खिशात घातली. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वन डे मालिका जिंकली आणि त्यातही इतिहास रचला गेला. भारताचा वन डे मालिकेतील वेस्ट इंडिजवरील हा पहिलाच व्हाइटवॉश ठरला. याआधी भारताला विंडीजवर कधीच निर्भेळ यश मिळवता आले नव्हते. या ऐतिहासिक कामगिरीनंतर रोहितने जेतेपदाच्या चषक अनावरण सोहळ्यात जे केले, त्यानं चाहत्यांचे मनही जिंकले. महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांची परंपरा रोहितने पुढे सुरू ठेवली. प्रसिद्ध कृष्णा मालिकावीर ठरला, तर श्रेयस अय्यरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
३ बाद ४२ अशा अवस्थेत असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी ११० धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पंत ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५६ धावांवर माघारी परतला. श्रेयस १११ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ८० धावांवर बाद झाला. दीपक चहरने ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून माघारी परतला. वॉशिंग्टनने ३३ धावा केल्या आणि भारताला १० बाद २६५ धावांचा पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरूवात निराशाजनक झाली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी चांगली गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार निकोलस पूरन ( ३४), ओडीन स्मिथ ( ३६) आणि अल्झारी जोसेफ ( २९) यांनी संघर्ष दाखवला. प्रसिद्धने अखेरची विकेट घेत विंडीजचा संघ १६९ धावांवर माघारी पाठवला. मोहम्मद सिराजने २९ धावांत ३, प्रसिद्धने २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव ( २-५१) व दीपक चहर ( २-४१) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या विजायनंतर रोहितने जेतेपदाची ट्रॉफी युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याच्याकडे दिली आणि स्वतः बाजूला जाऊन उभा राहिला.
पाहा व्हिडीओ..