India vs West Indies 3rd ODI Live Updates : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिसऱ्या वन डे सामन्यात तर तो शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु पावसाने घोळ घातला. ९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यामुळे गिलचे वन डे तील पहिले शतक झळकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ९२ धावांवर खेळत असताना इंग्लंडविरुद्धचा वन डे सामना पावसामुळे रद्द करवा लागला. आज गिलच्या वाट्याला ते दुःख आले.
त्यानंतर मैदानावर उतरलेल्या गिल व श्रेयस अय्यर यांनी पहिल्या दोन षटकांत ३१ धावा कुटल्या. या दोघांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली, ३३व्या षटकात अकिल होसैनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ४४ ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव ( ८) वॉल्स ज्युनियरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. ९७ धावांवर असताना गिलसाठी विंडीजच्या खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले आणि त्यासाठी DRS ही घेतले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. पण, पावसाने भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली.
प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या. ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.