पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अॅश्ले नर्सने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली. या सामन्यात नर्सने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. पण या सामन्यात नर्सने शिखर धवनला बाद केल्यावर 'नागीन' स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले होते. पण वेस्ट इंडिजच्या संघामध्ये ही 'नागीन' स्टाईल कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का...
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांचे बिनीचे फलंदाज बाद झाल्यावर नर्सने संघाचा डाव सावरला होता. नर्सने फक्त 22 चेंडूंत 40 धावांची तडफदार खेळी साकारली होती. त्यानंतर गोलंदाजीमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात शिखर धवनला बाद केल्यावर नर्सने 'नागीन' स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.
आपल्या 'नागीन' स्टाईलमधील सेलिब्रेशनबद्दल तो म्हणाला की, " आनंद सेलिब्रेट करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. आम्ही काही वर्षांपूर्वी चॅम्पियन्स या गाण्याच्या स्टाईलवरून आनंद साजरा करायचो. पण एका लीगमध्ये खेळताना मला सनी सोहेल या माझ्या मित्राने मला या स्टाईलबद्दल सांगितले. त्यानंतर मी ही स्टाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहिली आणि ती मला चांगलीच आवडली. त्यामुळे या सामन्यात मी 'नागीन' स्टाईलमध्ये आनंद साजरा केला. "