India vs West Indies, 3rd T20I Live Updates : दीपक चहरने ( Deepak Chahar) पहिल्या दोन षटकांत वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाला दणक्यात सुरूवात करून दिली. पण, निकोलस पूरन व रोवमन पॉवेल या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करून विंडीजचे कमबॅक करून दिले. मात्र, हर्षल पटेलनं ही भागीदारी तोडली. भारतीय संघाने पुनरागमन केलेले असताना प्रमुख गोलंदाज दीपक चहर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत. किरॉन पोलार्डही ५ धावांवर माघारी परतला. विंडीजच्या ४ बाद ८२ धावा झाल्या आहेत.
फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. फॅबियन अॅलनच्या गुगलीला अय्यर फसला अन् होल्डरच्या हाती झेल देऊन २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित ७ धावांवर बाद झाला.
मात्र, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) या जोडीने चांगली फटकेबाजी केली. त्यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्या विंडीजसमोर तगडे आव्हान उभे केले. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने पाचव्या चेंडूवर कायल मेयर्सला ( ६) बाद केले. मैदानावरील अम्पायरने कॅचची अपील नाकारल्यानंतर रोहितने त्वरित DRS घेतला आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर पुढच्या षटकातच चहरने विंडीजचा दुसरा सलामीवीर शे होप्स ( ८) याचीही विकेट घेतली. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर ( १४ चेंडू) चालते केले.