IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

India vs West Indies 3rd T20I Live Updates : कायले मेयर्सच्या दमदार फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हैराण करून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:14 PM2022-08-02T23:14:13+5:302022-08-02T23:20:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 3rd T20I Live Updates : India needs 165 runs to win the 3rd T20 against West Indies. | IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 3rd T20I Live Updates : कायले मेयर्सच्या दमदार फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हैराण करून सोडले. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचे दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने  स्वीकारले. आवेश खानच्या गोलंदाजीची वाट लावताना विंडीजच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या. आवेशच्या तीन षटकांत विंडीजने ४७ धावा कुटल्या. शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. 

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते, पण रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाईल, याचा अंदाज कुणी बांधला नव्हता. भारतीय संघात जडेजाच्या जागी आज दिपक हुडाला संधी देण्यात आली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. किंग्सने २० चेंडूंत २० धावा करताना तीन चौकार खेचले आणि हार्दिक पांड्याने त्याची विकेट मिळवून दिली. हार्दिकची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही पन्नासावी विकेट ठरली. वेस्ट इंडिजला ५७ धावांवर पहिला धक्का बसला. हार्दिकने या विकेटसह ऐतिहासिक कामगिरी केली. 


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५००+ धावा अन् ५० विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहिद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे. कायले मेयर्सने आर अश्विनचा चेंडू षटकार खेचून मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पांड्या व आर अश्विन चांगली गोलंदाजी करताना दिसले, परंतु आवेश खानला मेयर्सने टार्गेट केले. त्याने आवेशच्या एका षटकात १५ धावा कुटल्या. मेयर्स व निकोलस पूरन यांची ५० धावांची भागीदारी भुवनेश्वर कुमारने संपुष्टात आणली. विंडीजचा कर्णधार पूरन २२ धावांवर झेलबाद झाला. 

भुवीने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करणाऱ्या मेयर्सला त्याने बाद केले. या विकेटसह भारताकडून जलदगती गोलंदाजांमध्ये ट्वेंटी-२०त सर्वाधिक बळींचा विक्रम त्याने नावावर केला. युजवेंद्र चहल ७९ विकेट्ससह आघाडीवर आहे, तर भुवीच्या नावावर ७३ विकेट्स आहेत. आवेश पुन्हा एकदा महागडा ठरला आणि शिमरोन हेटमायरने १९व्या षटकात १७ धावा चोपल्या. अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या. 

Web Title: IND vs WI 3rd T20I Live Updates : India needs 165 runs to win the 3rd T20 against West Indies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.