India vs West Indies, 3rd T20I Live Updates : अखेर आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली, परंतु मौके पे चौका मारण्यात तो अपयशी ठरला. युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रोहित शर्माने स्वतः सलामीला न येता ऋतुराज व इशान किशन यांना पाठवले. पण, अवघ्या १० धावांची त्यांची भागीदारी ठरली. त्यानंतरही रोहितने श्रेयस अय्यरला पुढे केले. इशान व अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, एकामागोमाग हे सेट फलंदाज बाद झाले. चांगल्या लयात दिसलेला इशान ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून रोहित प्रचंड नाराज दिसला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या संघात आजच्या सामन्यात चार बदल करण्यात आले आहेत. IPL 2022 Mega Auction मध्ये लखनौ सुपर जायंट्सने १० कोटींची बोली लावून ताफ्यात दाखल करून घेतलेल्या आवेश खान ( Avesh Khan) याने आज भारतीय संघाकडून पदार्पण केले. पण, रोहितने सर्व अंदाज चुकवून संघात चार बदल केले. शार्दूल ठाकूर, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि आवेश खान यांना अंतिम ११ मध्ये संधी मिळाली.
आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड व इशान किशन यांना सलामीला खेळण्याची संधी दिली. दोन सामन्यांत बाकावर बसून राहिलेल्या ऋतुराजने चौकाराने खाते उघडले, परंतु जेसन होल्डरच्या अनुभवासमोर तो फसला. अवघ्या ४ धावा करून त्याला माघारी जावे लागले. रोहितने तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला पाठवले आणि इशानसह त्याने चांगले फटके मारले. इशानने चौथ्या षटकात रोमारियो शेफर्डला तीन चौकार खेचले, त्यानंतर पुढील षटकात अय्यरने होल्डरला दोन चौकार मारले. भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ४३ धावा केल्या. ७व्या षटकात फॅबियन अॅलनने स्वतःच्याच गोलंदाजीवर इशान किशनला झेल सोडला. इशान व अय्यरने ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.
फॅबियनच्या गुगलीला अय्यर फसला अन् होल्डरच्या हाती झेल देऊन २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि नॉन स्ट्राईकर रोहित त्याच्या शॉट सिलेक्शनवर नाराज दिसला.