India vs West Indies, 3rd T20I Live Updates : अखेर आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली, परंतु मौके पे चौका मारण्यात तो अपयशी ठरला. युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रोहित शर्माने स्वतः सलामीला न येता ऋतुराज व इशान किशन यांना पाठवले. पण, अवघ्या १० धावांची त्यांची भागीदारी ठरली. त्यानंतरही रोहितने श्रेयस अय्यरला पुढे केले. इशान व अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, एकामागोमाग हे सेट फलंदाज बाद झाले. रोहितलाही आज फार काही खास करता आले नाही आणि त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.
ऋतुराजने चौकाराने खाते उघडले, परंतु अवघ्या ४ धावा करून तो माघारी परतला. ७व्या षटकात फॅबियन अॅलनने स्वतःच्याच गोलंदाजीवर इशान किशनला झेल सोडला. इशान व अय्यरने ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. फॅबियनच्या गुगलीला अय्यर फसला अन् होल्डरच्या हाती झेल देऊन २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि नॉन स्ट्राईकर रोहित त्याच्या शॉट सिलेक्शनवर नाराज दिसला. रोहित व सूर्यकुमार यादव यांनी षटकार खेचून वातावरण निर्मिती केली, परंतु डॉमिनिक ड्रॅक्सने भारताला झटका दिला. रोहित ७ धावांवर बाद झाला.
सूर्यकुमार आज वेगळ्याच मुडमध्ये होता आणि त्याने मारलेले सुरेख फटके चाहत्यांची दाद मिळवून गेले. वेंकटेश अय्यरची त्याला चांगली साथ मिळाली. रोहितची विकेट घेणाऱ्या ड्रॅक्सने टाकलेल्या १६व्या षटकात या दोघांनी १७ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एकेरी धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजांत रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. तो ३८वेळा एकेरी धावेवर बाद झाला आहे आणि या विक्रमात आयर्लंडचा केव्हिन ओ'ब्रायन ( ४२) अव्वल स्थानावर आहे. रोहितने बांगलादेशचा मुशफिकर रहिमच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ( ३७) याला नकोशा विक्रमात मागे सोडले.
Web Title: IND vs WI, 3rd T20I Live Updates : Rohit Sharma unwanted record, Most times getting out on Single Digit Scores in T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.