India vs West Indies 3rd T20I Live Updates : दुसऱ्या ट्वेंटी-२०त दुखापतीमुळे मुकलेल्या कुलदीप यादवने आज कमाल केली. त्याने वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना बाद करून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद ५०+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. कुलदीपने २९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना वनिंदू हसरंगाला ( ३०) मागे टाकले. भारताकडून ट्वेंटी-२०त ५०+ विकेट्स घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या धावा रोखून धरल्या होत्या, परंतु रोव्हमन पॉवेलने वादळी फटकेबाजी केली.
कसोटी मालिकेत दमदार पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालला आज ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी दिली गेली आहे. भारताकडून ट्वेंटी-२०त सलामीला येणारा यशस्वी ( २१ वर्ष व २२३ दिवस) हा युवा फलंदाज ठरला. मागील सामन्यात अक्षर पटेलला एकही षटक न मिळालेल्या अक्षरने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. कर्णधार हार्दिकने पहिल्या चार षटकांत ४ गोलंदाजांचा वापर करून वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. कायल मायर्स व ब्रेंडन किंग यांनी चांगली सुरूवात करून देताना ७ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. आठव्या षटकात अक्षर पटेलने ही जोडी तोडली अन् मायर्स २५ धावांवर अर्शदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. अक्षरने ४ षटकांत २४ धावांत १ विकेट घेतली. ( अक्षरने मिळवून दिली पहिली विकेट Video
११व्या षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर जॉन्सन चार्ल्स ( १२) पायचीत झाला. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले होते आणि DRS घ्यायचा की नाही याबाबत भारतीय खेळाडूही संभ्रमात होते. पण, १ सेकंद शिल्लक असताना हार्दिकने DRS घेतला अन् तो यशस्वी ठरला. फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनने येताच षटकार-चौकार खेचले. विंडीजकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदांत पुरन ( १६१४) दुसऱ्या स्थानावर आला. ख्रिस गेल ( १८९९) अव्वल स्थानी आहे. कुलदीपच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात पूरन ( २०) यष्टिचीत झाला. त्याच षटकात कुलदीपने आणखी एक सेट फलंदाज किंगला ( ४२) बाद केले. ही त्याची ट्वेंटी-२०तील पन्नासावी विकेट ठरली.
कुलदीपने २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलला ३३ धावा देऊन एकही विकेट घेता आली नाही. १८व्या षटकात मुकेश कुमारला पहिले षटक दिले गेले अन् त्याने पहिल्याच चेंडूवर शिमरोन हेटमायरला ( ९) झेलबाद करून माघारी पाठवले. रोव्हमन पॉवेलने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून संघाला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. अर्शदीपने टाकलेल्या १९व्या षटकात पॉवेलने १७ धावा चोपल्या. मुकेशने २०व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवेलने १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा करून संघाला ५ बाद १५९ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IND vs WI 3rd T20I Marathi Live :Kuldeep Yadav is the fastest Indian to complete 50 wickets in Men's T20I, West Indies 159/5
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.