Join us  

IND vs WI, 3rd T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आमची नजर आहे; रोहित शर्माने सांगितला संघातील 'पॉझिटिव्ह' बदल...

India vs West Indies, 3rd T20I Live Updates :  भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 9:25 AM

Open in App

India vs West Indies, 3rd T20I Live Updates :  वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेतही ३-० असे निर्भेळ यश मिळवले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर ( २-१५), वेंकटेश अय्यर ( २-२३) व शार्दूल ठाकूर ( २-३३) यांनीही कमाल गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून  निकोलस पूरन ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावा आणि रोवमन शेफर्ड २९ धावा करताना संघर्ष केला.  

तत्पूर्वी,  श्रेयस अय्यर ( २५) व इशान किशन ( ३४) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर  सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर  या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. 

रोहित शर्मा काय म्हणाला?''प्रथम फलंदाजी असो किंवा धावांचा पाठलाग, सतत स्वतःला आव्हान देत राहणं हे संघासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला सातत्याने कामगिरीत सुधारणा करत राहायची आहे. आमची मधली फळी नवीन आहे, त्यामुळे एकेक बॉक्स टिक करून पुढे जायचे आहे. मालिका जिंकण्याचा आनंद आहेच. या  मालिकेतून आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं आहे. धावांचा पाठलाग करण्याची ताकद या संघात आहे. अनेक खेळाडूंना मुकावे लागले आहे,''असे रोहित म्हणाला.

तो पुढे म्हणाला,''तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा वेगळी आव्हानं असतात. या खेळाडूंनी संघाला आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर काढले आणि हीच मला त्यांच्याकडून अपेक्षा होती. हे चांगले संकेत आहेत. वन डे मालिकेनंतर ट्वेंटी-२०तही मधल्या फळीत झालेली सुधारणा ही सकारात्कम बाब आहे. आता वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर आहे आणि या खेळाडूंनी त्यासाठी सज्ज असायला हवं, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. मी प्रतिस्पर्धी संघाकडे पाहत नाही, तर एक संघ म्हणून आपण किती चांगली कामगिरी करू शकतो, हे पाहतो. "

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App