India vs West Indies 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखले. विंडीजने पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतलेली आणि तिसरा सामना भारतासाठी निर्णायक होता. सूर्यकुमार यादव ( ८३) व तिलक वर्मा ( ४९*) या दोघांनी भारताला हा महत्त्वाचा विजय मिळवून दिला. ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर वन फलंदाज सूर्याचा क्रिकेटच्या या झटपट फॉरमॅटमधील दबदबा अविश्वसनीय आहे. पण, वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या फलंदाजांला प्रभाव पाडता आलेला नाही. त्यावरूनच सूर्याने काल सामन्यातनंतर एक प्रतिक्रिया दिली अन् त्याने सर्वांची मनं जिंकली. वन डे क्रिकेटमध्ये फार चांगली कामगिरी झालेली नाही, याचा त्याने प्रामाणिकपणे स्वीकार केला अन् हे सत्य स्वीकारताना लाज वाटण्यासारखे काहीच नसल्याचे प्रांजळ मत त्याने व्यक्त केले.
सूर्याने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ४४ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्याने शिखर धवनला मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे. विंडीजच्या १६० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताने ३ बाद १६४ धावा केल्या. सूर्यकुमारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, मी काही वेगळं केलं नाही. मी माझा खेळ केला आणि मला हवी तशी फटकेबाजी झाली. मी शतकासाठी किंवा विक्रमासाठी खेळलो नाही. संघाला जशी गरज असेल त्यानुसार मी माझा खेळ करतो, मग मी ४७ धावांवर असो किंवा ९८ धावांवर असो... ध्येय गाठण्यासाठी मी चौकार किंवा चौकार खेचतो. मी संघाची गरज पूर्ण करण्यासाठी खेळतो.''
आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. पण, त्याला विंडीजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत १९, २४ व ३५ धावाच करता आल्या आहेत. सूर्यकुमारला २०२३ मध्ये १० वन डे सामन्यांत १४च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत.
यावर सूर्यकुमार म्हणाला, ''आम्ही भरपूर ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि ती आता एक सवय झाली आहे. दरम्यान आम्ही तितके वन डे सामने खेळलेले नाही. वन डे फॉरमॅट आव्हानात्मक आहे. यात सामन्यानुसार तुम्हाला तुमच्या रणनीतीत बदल करावा लागतो. जर पटापट विकेट पडल्या, तर तुम्हाला जास्त वेळ खेळपट्टीवर उभं राहावं लागतं. मधल्या षटकांत चेंडू व धावांचा वेग समान राखायला लागतो आणि अखेरच्या षटकांत ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी करावी लागते.''
''मी या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय आणि संघ व्यवस्थापनाने मला वन डे संघाबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला माझा नैसर्गिक करण्याआधी खेळपट्टीवर टीकून खेळण्याचा सल्ला दिला आहे. वन डे क्रिकेटमधील माझी कामगिरी निराशाजनक आहे आणि हे मान्य करण्यात लाज वाटत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतोय. रोहित व राहुल यांच्या म्हणण्यानुसार मी या फॉरमॅटमध्ये जास्त खेळलेलो नाही. त्यांनी मला सांगितलं की तू शेवटची १५ ते १८ षटकं खेळणार असशील, तर त्यातील ४५- ५० चेंडू तू खेळावी, असे आम्हाला वाटतं आणि त्यानुसार तू खेळ," असे सूर्यकुमारने सांगितले.
आता ही माझी जबाबदारी आहे, की माझं काम कसं यशस्वी करत आणि संधीचं सोनं करून संघाची कशी मदत करतो, असेही सूर्या म्हणाला.
Web Title: IND vs WI 3rd T20I : SuryaKumar Yadav has ‘no shame’ in accepting his ODI numbers are very poor
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.