India vs West Indies, 4th T20I Live Update : भारताच्या १९१ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवातच निराशजन झाली. ब्रेंडन किंग्स ( १३) व कायले मेयर्स ( १४) हे सलामीवीर आवेश खान व अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाले. डेव्हॉन थॉमसही १ धाव करून आवेशला विकेट देऊन माघारी परतला. कर्णधार निकोलस पूरनने ८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २४ धावा कुटल्या, परंतु त्याच्याच सहकाऱ्याने त्याला रन आऊट केले. एक धाव घेण्याचा कॉल दिल्यानंतर सहकारी माघारी फिरला अन् पूरनला धावबाद व्हावे लागले. आधीच गोंधळलेल्या विंडीजला रिषभ पंतनेही छळले...
रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.४ षटकांत फलकावर ५३ धावा चढवल्या. रोहित १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३३ धावांवर बाद झाला. पण, त्याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. रोहितने ३३ धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले. ख्रिस गेल ५३३ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितने आज ४७७ वा षटकार खेचून पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला.
सूर्यकुमार २४ धावांवर माघारी परतला. दीपक हुडा व रिषभ पंत यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली. अल्झारी जोसेफने भारताला दुसरा धक्का देताना हुडाला २१ धावांवर माघारी पाठवले. पंत सुसाट खेळला, त्याने ३१ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसनने नाबाद ३० धावा केल्या. अक्षर पटेलने ८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून नाबाद २० धावा करताना भारताला ५ बाद १९१ धावांचा टप्पा गाठून दिला. विंडीजचे ६ फलंदाज १०१ धावांवर माघारी पाठवून भारताने विजय निश्चित केला.