पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना जिंकून वेस्ट इंडिजने ३-२ ने मालिका आपल्या नावावर केली. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताला ८ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या या पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण ट्विटरवर ट्रोल होऊ लागला. खरं तर भारताने ट्वेंटी-२० विश्वचषकात रविवारच्या दिवशी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता.
दरम्यान, वेस्ट इंडिजने देखील रविवारचा सामना जिंकून भारताला पराभवाची धूळ चारली. वर्ल्ड कप २०२२ मध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफान पठाणने मजेशीर ट्विट केले होते, ज्यामध्ये लिहिले होते, "शेजाऱ्यांनो रविवार कसा होता?." एकूणच भारताच्या विजयानंतर पठाणने पाकिस्तानची फिरकी घेतली होती.
आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर काही पाकिस्तानी चाहते रविवारचा दाखला देत इरफान पठाणला ट्रोल करत आहेत.
अखेरच्या सामन्यात भारताने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजला कायल मेयर्सच्या रूपात पहिला झटका बसला. पण, किंग आणि निकोलस पूरन यांनी अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कॅरेबियन संघाने १८ षटकांत २ गडी गमावून १७८ धावा करून विजय साकारला. भारताकडून तिलक वर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये निकोलस पूरनच्या रूपात आपला पहिला बळी पटकावला. अर्शदीप सिंगने सुरूवातीला एक बळी घेऊन विडिंजला मोठा झटका दिला पण त्यानंतर कोणत्याच भारतीय गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादव (६१) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९), तिलक वर्मा (२७), संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) आणि अर्शदीप सिंगने (८) धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर अकील हौसेन (२) आणि जेसन होल्डर (२) आणि रॉस्टन चेस यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
इरफान पठाणचे टीकाकारांना प्रत्युत्तरइरफान पठाणने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पठाणने ट्विट करून लिहले, "बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दीवाना." यापुढे त्याने रविवार आणि शेजारी असे हॅशटॅगही वापरले. या ट्विटद्वारे इरफानला सांगायचे आहे की, भारताला कोणी हरवले आणि दुसऱ्यालाच आनंद होत आहे.