फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज दोन्हीही संघ मैदानात आहेत. भारताने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने चांगली सुरूवात केली. कायल मेयर्स स्वस्तात माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. अद्याप दोघेही खेळपट्टीवर टिकून असून विडिंजने सामन्यात मजबूत पकड बनवली आहे.
ब्रँडन किंग ३८ चेंडूत ५४ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे, तर निकोलस पूरन देखील ४६ धावा करून आपल्या संघाला विजयाकडे नेत आहे. अर्शदीप सिंग वगळता एकाही भारतीय गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. खरं तर फ्लोरिडामध्ये रिमझिम पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे तूर्तास खेळ थांबवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजने १२.३ षटकांत १ गडी गमावून ११७ धावा केल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादव (६१) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९), तिलक वर्मा (२७), संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) आणि अर्शदीप सिंगने (८) धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर अकील हौसेन (२) आणि जेसन होल्डर (२) आणि रॉस्टन चेस यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.