वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवानंतर आता भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाचा बचाव केला आहे. तसेच मालिका गमावण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
राहुल द्रविड यांनी टी-२० मालिकेतील पराभवानंतर सांगितले की, तळाच्या फलंदाजीला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांना संधी दिली. त्यामुळे संघाच्या तळाच्या क्रमातील फलंदाजी कमकुवत झाली. अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघ वेगाने धावा जमवू शकला नाही. भारताने नऊ विकेट्स गमावून १६५ धावा जमवल्या. मात्र वेस्ट इंडिजने या आव्हानाचा अगदी आरामात पाठलाग केला.
सामन्यानंतर राहुल द्रविक म्हणाले की, येथे आम्ही जो संघ उतरवला होता. त्यामुळे आम्हाला संघात बदल करण्यासाठी योग्य तशी मोकळीक मिळाली नाही. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो. फलंदाजीमध्ये सखोलता आणणं ही त्यातीलच एक बाब आहे. आम्ही आपल्यापरीने सर्वतोपरी सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. निश्चितच हे असं क्षेत्र आहे. ज्यावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्ही आमची गोलंदाजी कमकुवत करू शकत नाही. मात्र आमच्या फलंदाजीमध्ये काही सखोलपणा येईल हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
वेस्ट इंडिजच्या संघामध्ये अष्टपैलूंचा भरणा आहे. तसेच अल्झारी जोसेफ ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत होता. तसेच तो मोठे फटके खेळण्यास सक्षम आहे. या छोट्या प्रकारामध्ये धावसंख्या सातत्याने मोठी होत चालली आहे. असे अनेक संघ आहेत, ज्यांच्या फलंदाजीमध्ये सखोलता आहे. निश्चितपणे याबाबतीत आमच्यासमोर आव्हानं आहेत, त्यावर मेहनत घेण्याची गरज आहे. तळाची फलंदाजी भक्कम करणं आवश्यक आहे, हे या मालिकेने आम्हाला दाखवून दिले आहे, असेही राहुल द्रविड यांनी सांगितले.
यावेळी राहुल द्रविड यांनी तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या युवा खेळाडूंचं कौतुक केलं. तसेच या तिन्ही पदार्पणवीरांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावली, असे द्रविड यांनी सांगितले.