हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्याच्या घडीला पृथ्वी शॉ हा भारतीय सलामीवीर चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्याच डावात पृथ्वीने शतक झळकावले होते. त्यानंतर पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अशी एक गोष्ट घडली की, पृथ्वी शॉचा सचिन झाला नाही, असे चाहते म्हणायला लागले
विजयासाठी आव्हानाचा पाठलाग करायला भारतीय सलामीवीर उतरले. पृथ्वीला तिसऱ्या षटकात फलंदाजी करत असताना उजव्या हाताला चेंडू लागला. त्यानंतर वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने त्याच्यावर बाऊन्सरचा मारा सुरु केला. पाचव्या षटकात एक अशी घटना घडली की त्यामुळे सर्वांनाच सचिनची आठवण आली.
पाचव्या षटकाच्या पहिलाच चेंडू होल्डरने बाऊन्सर टाकला. यावेळी पृथ्वी हा चेंडू सोडण्यासाठी खाली वाकला. पण चेंडूची उंचीही जास्त नव्हती. हा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. यावेळी होल्डरने पंचांकडे अपील केले. त्यावेळी पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पण होल्डरने त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली तेव्हा पृथ्वी बाद होत असल्याचे दिसत होते. अशीच एक गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात असताना झाली होती. सचिनच्या हेल्मेटला असाच एक चेंडू लागला होता. त्यावेळी सचिनला बाद दिल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यामुळेच यावेळी पृथ्वीचा सचिन झाला नाही, असे काही चाहते म्हणत होते.