भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिजकडून सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात रडतखडत जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात प्रायोगिक तत्त्वावर काही फेरबदल करण्यात आले होते. मात्र हे बदल भारतीय संघावर उलटले आणि संघाला यजमानांकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पांड्याने निराशा व्यक्त केली. पराभवासाठी खराब फलंदाजीला दोषी ठरवले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पांड्याने संघाचं नेतृत्व केलं. पराभवानंतर त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. तसेच या पराभवाचं खापर त्याने संघाच्या खराब फलंदाजीवर फोडलं. हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्ही ज्याप्रकारे फलंदाजी करायला पाहिजे होती, त्या प्रकारे फलंदाजी केली नाही. पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात खेळपट्टी खूप चांगली झाली. या पराभवामुळे आमची निश्चितच निराशा झाली आहे. मात्र त्यातून खूप काही शिकायला मिळालं आहे. सलामीवीर म्हणून इशान किशन याने ज्याप्रकारे फलंदाजी केली. ती खूप महत्त्वपूर्ण आहे. शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र होप आणि कार्टी यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला.
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मला वर्कलोड वाढवावा लागेल. अधिक षटके गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या क्षणी मी ससा नाही तर कासव आहे. मात्र विश्वचषक येईपर्यंत सारं काही सुळळीत होईल, अशी अपेक्षा आहे. आता मालिका बरोबरीत असल्याने प्रेक्षकांसोबत खेळाडूंसाठीही तिसरा सामना हा खूप रोमांचक ठरेल, असे भाकितही त्याने केले.
या सामन्यात भारतीय संघ अवघ्या १८१ धावात गारद झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजने हे आव्हान ८० चेंडू राखून ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. आता दोन्ही संघांमधील पुढील सामना १ ऑगस्ट रोजी त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.