राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : घरच्या मैदानावर भारतीय संघाने हुकूमत गाजवताना पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांत गुंडाळला. यामुळे वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. वेस्ट इंडिज 468 धावांनी पिछाडीवर गेला आहे. भारताने पहिल्या डावात घेतलेली ही तिसरी मोठी आघाडी आहे.
भारताने पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचे सहा फलंदाज 74 धावांवर बाद झाले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्यांच्यावर फॉलोऑन टाळण्याचे आव्हान होते. रोस्टन चेस (53) आणि किमो पॉल (47) यांनी वेस्ट इंडिजचा संघर्ष तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्याच प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. आर. अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताने पहिल्या डावात घेतलेली ही तिसरी मोठी आघाडी ठरली. या क्रमवारीत 2007 मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्धची 492 धावांची आघाडी अग्रक्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर 2011 मधील वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता कसोटीत 478 ही धावसंख्या आहे.