भारत आणि वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) यांच्यातल्या वन डे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण, तीन दिवसआधी भारताच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांसह श्रेयस अय्यर व नवदीप सैनी या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रोहित शर्माचे ( Rohit Sharma) टीम इंडियात पुनरागमन झाले असताना सोबत सलामीला कोण खेळणार हा प्रश्न आहे. धवन व ऋतुराज हे सलामीवीर पॉझिटिव्ह आढळूनही KL Rahul पहिल्या वन डे सामन्यात न खेळण्यावर ठाम आहे. त्यामागचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करताना BCCIने आधीच स्पष्ट केलं होतं की, लोकेश राहुल पहिली वन डे खेळणार नाही. पण, आता हाती आलेल्या माहितीनुसार लोकेश राहुल ६ फेब्रुवारीला टीम इंडिया सोबत असणार आहे, परंतु तो मॅच खेळणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लोकेशच्या खांद्यावर वन डे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत तो सलामीला खेळला होता. पण, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला ०-३ असा मालिका पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मायदेशात होणाऱ्या मालिकेतील पहिल्याच वन डेत खेळणार नसल्याचे त्यानं बीसीसीआयला कळवले. त्याच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यामुळे तो पहिली वन डे खेळणार नाही. तो ६ फेब्रुवारीला बायो बबलमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर तो उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
रोहितच्या पुनरागमनामुळे लोकेशला पुन्हा मधल्या फळीत खेळावे लागणार आहे. पहिल्या वन डेत सूर्यकुमार, रिषभ पंत किंवा वेंकटेश अय्यर त्याच्या जागी खेळतील. दिपक हुडालाही संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयनं मयांक अग्रवालला बोलावले असून तो रोहितसह सलामीला खेळू शकतो.
भारताचा टी-२० संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.