IND vs WI : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजकडून हार मानवी लागली. यंदाच्या वर्षात भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे, परंतु भारतीय संघात अजूनही प्रयोग सुरूच आहे. २०१९ लाही चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला कोण, हा प्रश्न आजही कायम आहे. श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय आणि त्यांच्या पुनरागमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे भारतीय संघात प्रयोग होताना दिसत आहेत आणि त्यावरून कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होतेय. पण, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ ( Former Indian cricketer Mohammad Kaif ) यांनी भारतीय संघावर टीका करू नका, त्यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन चाहत्यांना केलं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा व विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. दुसऱ्या वन डेत त्यामुळे वेस्ट इंडिजने विजय मिळवला अन् मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. पण, तिसऱ्या सामन्यात भारताच्या युवा संघाने दणदणीत विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली.
रविवारी मोहम्मद कैफने एक ट्विट केलं आणि त्यांनी फॅन्सना संघावर टीका करू नका असं आवाहन केलं. क्रिकेट चाहत्यांसाठी एक छोटीशी विनंती. भारतीय संघावर टीका करू नका. एकता दाखवा, खेळाडूंच्या वैयक्तिक निवडीनुसार विभाजित होऊ नका. रोहित आणि द्रविड यांनी बुमराहसारख्या स्टारशिवाय मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. वर्ल्ड कप घरी होणार आहे आणि खेळाडूंना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे,''असे कैफने लिहिले.
“काही लोकांना धक्का बसला कारण आम्ही विश्वचषकासाठी पात्र न ठरलेल्या संघाकडून हरलो. अनेकांना वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे एकमेव काम विश्वचषक जिंकणे आहे. लोकांना वाटते की आयपीएलमुळे भारत विश्वचषक जिंकण्यासाठी फेव्हरिट आहे,” असे अश्विन म्हणाला.