मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताला पहिल्या दिवशी ४ बाद ३६४ अशी मजल मारता आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत पृथ्वीने धडाकेबाज शतक झळकावले. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनीही अर्धशतके झळकावत संघाच्या धावसंख्येला चांगलाच हातभार लावला.
भारताचा सलामीवीर लोकेश राहुल हा शून्यावर बाद झाला. पण पृथ्वीने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत दिवस गाजवला. पृथ्वीने १९ चौकारांच्या जोरावर १३४ धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भक्कम भागीदारी रचली. पुजाराने यावेळी १४ चौकारांच्या जोरावर ८६ धावा केल्या. पहिल्या दुवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली ७२ धावांवर खेळत होता.