Rohit Sharma : कसोटी मालिकेत यजमान वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर वन डे मालिकेसाठी रोहितसेना सज्ज झाली आहे. आजपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. बार्बाडोस येथे सायंकाळी सात वाजल्यापासून पहिल्या सामन्याला सुरूवात होईल. या सामन्याच्या आधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली रणनीती स्पष्ट केली. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असल्याचे त्याने म्हटले.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्माने या मालिकेबद्दल भाष्य केले. "या वन डे मालिकेत काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, म्हणून ही मालिका महत्त्वाची आहे. कारण त्यांनी जास्त सामने खेळले नाहीत. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं, ते या भूमिकेत कशी कामगिरी करतात हे पाहण्याची संधीही आम्हाला मिळेल", असे रोहितने सांगितले. तसेच मागच्या वर्षीही ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी आम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते की, संघात आलेल्या नवीन खेळाडूंना नवीन भूमिका द्यावी आणि ते ती भूमिका कशी निभावतात ते पाहावे. वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामने खेळायचे आहेत. कोणत्या युवा शिलेदारांना संधी देता येईल, काय करता येईल, हे सर्वकाही पाहून त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही भारतीय कर्णधाराने नमूद केले. एकूणच आगामी वन डे विश्वचषकासाठी ही तयारी सुरू असल्याचे रोहितने स्पष्ट केले.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वन डे मालिका
- पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद (सायंकाळी ७ वाजल्यापासून)