India vs West Indies Series : भारत- वेस्ट इंडिज वन डे मालिकेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोना स्फोट झाला. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ उडाला. या चार खेळाडूंसह थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू आणि सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन डे ६ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे आणि कोरोना स्ट्राईकमुळे ही मालिका होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
''भारताच्या ताफ्यातील तीन खेळाडूंसह सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे निवड समितीनं मयांक अग्रवाल याचा भारताच्या वन डे संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे,''अशी माहिती बीसीसीआयने दिली. ''दोन्ही संघातील खेळाडूंना खबरदारीचा उपाय म्हणून विलगिकरणात जाण्यास सांगितले आहे. भारताच्या ताफ्यातील तीन खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तेही विलगिकरणात आहेत. या मालिकेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ती होईल. गरज वाटल्यास आम्ही बदली खेळाडू बोलवू,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- सलामीवीर शिखर धवन आणि जलदगती गोलंदाज नवदीप सैनी ( राखीव खेळाडू) यांची सोमवारी RT-PCR टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
- क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलिप आणि Security Liaison Officer बी लोकेश यांचीही सोमवारी RT-PCR टेस्ट घेण्यात आली आणि त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
- ऋतुराज गायकवाड याची मंगळवारी टेस्ट झाली आणि तो पॉझिटिव्ह आला. पण, सोमवारी पहिल्या राऊंडमध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
- श्रेयस अय्यर आणि स्पोर्स्ट मसाज थेरपिस्ट राजीव कुमार यांची बुधवारी झालेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दोघांचाही पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर आता क्वारंटाईन आहेत. लोकेश राहुलही पहिल्या वन डेत खेळणार नाही. त्यामुळे आता रोहित शर्मासोबत पहिल्या सामन्यात मयांक अग्रवाल सलामीला येण्याची शक्यता आहे. 14 महिन्यांपूर्वी मयांक वन डे सामना खेळला होता.