India vs West Indies ODI Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना आज सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. रोहित शर्माला विश्रांती दिल्यामुळे शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ या वन डे मालिकेत युवा खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिकाही होणार आहे, परंतु त्यापूर्वी लोकेश राहुल ( KL Rahul) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो ट्वेंटी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले. त्यात वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) या वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. या मालिकेसाठी जडेजाची उप कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, परंतु आता तोच खेळणार नसल्याचे चित्र दिसतेय. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाच्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे आणि त्याला मेडिकल टीमने विश्रांतीचा सल्ला दिला आहे. संघ व्यवस्थापनही जडेजाच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत. BCCI मधील सूत्रांच्या माहितीनुसार जडेजा वन डे मालिकेत खेळण्याची शक्यता फार कमीच आहे. ३३ वर्षीय जडेजाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. एक चांगली गोष्ट अशी की ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी जडेजा तंदुरुस्त होण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जडेजाच्या जागी आता उप कर्णधार म्हणून कोणाची निवड होईल, याची उत्सुकता लागली आहे. सध्याच्या संघात शार्दूल ठाकूर व युजवेंद्र चहल हे दोन सीनियर खेळाडू आहेत.
भारताचा वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
वन डे मालिका-२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)