पुणे : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेत जेसन होल्डरच्या विंडीज संघाकडून अनपेक्षित कामगिरी झालेली पाहायला मिळाली आहे. पहिल्या दोन वन डे सामन्यांत पाहुण्यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विंडीजने पहिल्या सामन्यात 322 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 321 धावांचा पाठलाग केला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांच्या या अनपेक्षित कामगिरीची भारतीय संघाने धास्ती घेतल्याचे विधान मुख्य प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी केले. विराट सेना आम्हाला घाबरले आहेत त्यामुळे त्यांनी पुढील सामन्यांसाठी मुख्य गोलंदाजांना पाचारण केल्याचा दावा लॉ यांनी केला आहे.
उर्वरित तीन वन डे सामन्यांसाठी भारताने जस्प्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या दोन प्रमुख गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. त्यावर लॉ म्हणाले,''मालिकेत पुनरागमन करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहेच. त्यामुळेच भारतीय संघाने वन डेतील दोन प्रमुख गोलंदाजांना पाचारण केले आहे. हेच आमचे यश आहे, त्यांना आम्ही घाबरणार नाही.''
ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेले लॉ यांनी विंडीजच्या कमी अनुभव असलेल्या फलंदाजांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. '' आमच्या फलंदाजांनी भारतीय संघाला स्वतःच्या कामगिरीचा विचार करण्यास भाग पाडले. येथे दाखल होण्यापूर्वी आमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, परंतु आम्ही त्याला उत्तर दिले आहे. आता भारतीय संघाला त्यांच्या कामगिरीचा विचार करावा लागत आहे,'' असे लॉ म्हणाले.भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना शनिवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे.