मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पृथ्वीची तुलना सचिनशी करणे योग्य नाही. कारण सचिन एक महान क्रिकेटपटू होते आणि पृथ्वीची कारकिर्द तर आत्ताच सुरु झाली आहे. पण या दोघांच्या फलंदाजीमध्ये फरक आहे. सचिन यांच्या फलंदाजीमध्ये संयम थोडा जास्त होता, पण पृथ्वी हा सचिन यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहे, असे पृथ्वीचे प्रशिक्षक प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी त्याच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतर सांगितले.
पदार्पणातच पृथ्वी शॉने शतकी खेळी साकारली आणि त्याची तुलना काही चाहत्यांनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर करायला सुरुवात केली आहे. पण पृथ्वीची सचिनबरोबरची तुलना त्याचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांना मात्र मान्य नाही.
पहिल्या सामन्यात शतक झळकावत पृथ्वीने आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली. पण एवढ्या लवकर यश मिळाल्यावर मात्र खेळाडूचे पाय जमिनीवर राहत नाही, अशी बरीच उदाहरणे आपण पाहिली आहेत. याबद्दल पिंगुळकर सर म्हणाले की, " लहानपणापासूनच पृथ्वी शांत स्वभावाचा आहे. तो कधीही उद्धटपणा करणार नाही. लहानपणापासून त्याचे पाय जमिनीवर आहेत. एकामागून एक त्याने यशाची शिखरे गाठली आहेत, पण कधीही त्याला अहंकार चिकटला नाही. त्यामुळे या शतकानंतर त्याला कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याचे खेळाकडे दुर्लक्ष होणार नाही आणि त्याचे पाय कायमच जमिनीवर राहतील. "
पृथ्वी हा हिरा आपल्याला सापडला आहे. पण या हिऱ्याला पहिल्यांदा पैलू पाडण्याचे काम पिंगुळलकर सरांनी केले. जवळपास १२ वर्षे त्यांनी पृथ्वीवर क्रिकेटचे संस्कार केले. त्यामुळेच पृथ्वीच्या क्रिकेटचा पाया भक्कम झाला.
काही खेळाडू आपल्या कारकिर्दीची झोकात सुरुवात करतात, पण त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्य दाखवता येत नाही. पण पृथ्वीला यापुढेही सातत्यपूर्ण कामगिरी करायची असेल तर त्याने काय करायला हवं, या प्रश्नावर पिंगुळकर सर म्हणाले की, " जर पृथ्वी कायम आपला नैसर्गीक खेळ करत राहीला तर त्याची कारकिर्द चांगलीच बहरू शकते. पृथ्वी १२ वर्षे माझ्याकडून क्रिकेट शिकला. यावेळी मी त्याच्या नैसर्गीक खेळाला कुठेही धक्का लावला नाही. त्याचा नैसर्गीक खेळ हा आक्रमक असाच आहे, त्यामुळे यापुढेही त्याने अशीच फलंदाजी करत रहावी."