राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिलाच दिवस गाजवला तो भारताच्या पृथ्वी शॉ याने... स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या मुंबईच्या या खेळाडूला इंग्लंड भ्रमंतीनंतर अखेरीस भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. त्याने या संधीचं सोनं करताना पदार्पणातच धडाकेबाज शतकी खेळी केली. पृथ्वीची फटकेबाजी पाहताना तो विंडीज गोलंदाजांना आणखी डोईजड होईल असे वाटत होते, परंतु विंडीजचा फिरकीपटू देवेंद्र बिशूने त्याला बाद केले.
सामन्याच्या 51व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बिशूने त्याला स्वतः झेलबाद करून माघारी धाडले. पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांच्या मदतीने 87.01 च्या सरासरीने 134 धावा केल्या. 134 धावांवर बाद झाल्यामुळे पृथ्वीला 49 वर्षांपूर्वीचा गुंडप्पा विश्वनाथ यांचा धावांचा विक्रम मोडता आला नाही. विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 137 धावांची खेळी केली होती. अवघ्या चार धावांनी पृथ्वीला हा विक्रम मोडता आला नाही.
पृथ्वीच्या 134 धावांच्या खेळीने मात्र माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. गांगुलीने 1996 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्यात त्याने 131 धावा केल्या होत्या. पृथ्वीने हा विक्रम मोडला. पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये पृथ्वी चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत शिखर धवन ( 187), रोहित शर्मा ( 177) आणि गुंडप्पा विश्वनाथ ( 137) आघाडीवर आहेत.
Web Title: IND VS WI: Prithvi Shaw broke Sourav Ganguly's 22 years old record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.