राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावून पृथ्वी शॉ याने आपली निवड योग्य असल्याचे दाखवले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याच्यासह सलामीला आला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल पायचीत होऊन माघारी परतल्यानंतर पृथ्वीने सामन्याची सुत्र हाती घेतली. त्याने चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. याच दरम्यान त्याने वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. त्याने 56 चेंडूंत 50 धावांची खेळी केली.
पदार्पणाच्या सामन्यात त्याने खणखणीत अर्धशतक झळकावत अनेक विक्रमही नावावर केले. पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो भारताचा दुसरा युवा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम विजय मेहरा यांच्या नावावर आहे. त्यांनी 1955 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत 17 वर्ष 265 दिवसांचे असताना ही कामगिरी केली होती. पृथ्वी 18 वर्षांचा आहे.