राजकोटः आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावण्याचा पराक्रम धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ यानं आज केला आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत, एकापेक्षा एक भारी फटके आत्मविश्वासाने खेळत पृथ्वीनं अवघ्या ९९ चेंडूत पहिलं कसोटी शतक साकारलं. या कामगिरीमुळे १८ वर्षं ३२९ दिवस वयाचा युवा कसोटी शतकवीरांच्या यादीत सातव्या स्थानी विराजमान झाला आहे. १९वा वाढदिवस साजरा करण्याआधी कसोटी शतक साजरं करणारा तो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरलाय.
टॉप १० युवा कसोटी शतकवीरांमध्ये तब्बल सहा जण पाकिस्तानचे आहेत. तर अव्वल स्थानी आहे बांगलादेशचा वीर. बघू या तरुण-तडफदार शतकवीरांची संपूर्ण यादी...
१. मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश) - १७ वर्षं ६५ दिवस - श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटी
२. मुश्ताक मोहम्मद (पाकिस्तान) - १७ वर्षं ८२ दिवस - भारताविरुद्ध दिल्ली कसोटी
३. सचिन तेंडुलकर (भारत) - १७ वर्षं ११२ दिवस - इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टर कसोटी
४. हॅमिल्टन मासाकाड्झा (झिम्बाब्वे) - १७ वर्षं ३५४ दिवस - वेस्ट इंडिजविरुद्ध हरारे कसोटी
५. इम्रान नाझीर (पाकिस्तान) - १८ वर्षं १५७ दिवस - वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाउन कसोटी
६. सलीम मलिक (पाकिस्तान) - १८ वर्षं ३२८ दिवस - श्रीलंकेविरुद्ध कराची कसोटी
७. पृथ्वी शॉ (भारत) - १८ वर्षं ३२९ दिवस - वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटी
८. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - १८ वर्षं ३३५ दिवस - भारताविरुद्ध चेन्नई कसोटी
९. मोहम्मद इलयास (पाकिस्तान) - १९ वर्षं २६ दिवस - न्यूझीलंडविरुद्ध कराची कसोटी
१०. मोहम्मद वासिम (पाकिस्तान) - १९ वर्षं १०८ दिवस - न्यूझीलंडविरुद्ध लाहोर कसोटी