राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आतापर्यंत रवींद्र जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पण हे शतक त्याने कोणाला समर्पित केले आहे आणि त्यावेळी जडेजा भावुक का झाला? हे तुम्हाला माहिती आहे का...
वेस्ट इंडिजविरुद्ध जडेजाने प्रत्येक पाच चौकार आणि षटाकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारली. जडेजाने आतापर्यंत ९ अर्धशतके झळकावली असली तरी त्याला आतापर्यंत एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या शतकाची वाट भारतीय संघही पाहत होता आणि जडेजाचे शतक झाल्यावर भारताने लगेचच डाव घोषित केला.
सामन्यानंतर जडेजा म्हणाला की, " हे माझे पहिलेच कसोटी शतक आहे आणि मला त्याचा आनंद आहे. लहानपणापासून ज्या व्यक्तीने मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. जिच्यामुळे मी क्रिकेटपटू होऊ शकलो. मी भारताकडून खेळायला हवं, हे जिचं स्वप्न होतं, त्या माझ्या आईला मी हे शतक समर्पित करतो. "